आय टी मधलं काम म्हणलं कि कधी "वीकेंड" येतो असं होतं. असाच एक कामाने वैतागलेला आठवडा संपत आलाच होता, की एका मित्राचा फोन येतो, " उद्या भिगवण ला जायचय, येतेस का ? पहाटे जाऊन दुपारी एक पर्यंत परत येऊ. " कामाने थकवा तर आलाच होता, पण पहाटेचा तो गारवा, सुर्य देवताचे ते नारंगी छटांमधले दर्शन, गावातली ती कुझबुज आणि निरागस पणे उडणारे ते पक्षी भिगवण कडे एक वेगळीच ओढ लावत होते. "हो, नाही" करता करता शेवटी मी भिगवणच्या वारीला होकार कळवला.
दुसऱ्या दिवशी शनिवारी, १३ एप्रिल ला पहाटे ४ वाजता आम्ही भिगवण ला जाण्यास निघालो. अजय आणि मी, आनंद च्या घरी, नगर रोड ला आधी गेलो. सगळं ठरवता ठरवता शेवटी आम्ही ३घेच जमलो होतो . १ -२ जणांचे अचानक येणे रद्द झाले. त्यापुढे आनंदच्या गाडीने प्रवास चालू झाला. पुणे - सोलापूर महामार्गावर तशी पहाटे ५ वाजता एवढी गर्दी नव्हती. अजय आणि आनंदचे गप्पा चालू झाल्या. मुलांना तशी कमीच झोप येत असावी, शिवाय मित्र म्हणलं कि कुठलातरी विषय शोधून काढायचाच बोलायला. ह्याच्या त्याच्या चौकश्या! मी मात्र तोपर्यंत एक झोप काढून घेतली.
तासाभराने, एका गाण्याच्या "fast track" ने जाग आली. एवढ्या उन्हाळ्यात, पहाटेचा तो गारवा एक मस्तं अनुभव देत होता. "fast track" बंद करून रेडियो लावण्यास सांगितला. हो, पण एवढ्या पहाटे रेडियो वर पण रियाझ च चालू होता :p. शेवटी मोबाईल मधे साठवलेला गाण्यांचा खजाना ऐकत गाडीतून बाहेर लक्ष गेलं तर नारंगी रंगाचा पट्टा मस्तं आकाशाच्या निळ्या आणि डोंगराच्या दगडी रंगान मध्ये मिसळून गेला होता.
बारामती-दौंड रोड वर, भिगवण चौक लागताच एक वळण घेतले व कुंभारगाव कडे निघालो. बाहेरच "Flamingoes point" ची पाटी लावली होती. अजय, आनंद आधीच येऊन गेल्यामुळे, बोट वाल्याचा नंबर होता. त्याच्या घरी जाऊन, फ्रेश होऊन त्याला गाडीत घेतले व बोटीकडे निघालो.
भिगवण चा तलाव, हा उज्जनी धरणाच्या कोंड पाण्याने बनला आहे. भव्य संखेने स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात येथे येत असल्यामुळे , " महाराष्ट्राचे भरतपूर" अशी त्याला उपमा दिलिए. तलावाकडे जाताच बरेच पक्षी विहार करत होते. मासेमार आपल्या कामात गर्क झाला होता.
ह्या वेळी तरी बरेच फ्लेमिंगो (राजहंस) दिसावेत, अशी अपेक्षा होती, आणि तसेच झाले :). २ महिन्यांपूर्वी जेव्हा गेलो होतो, तेव्हा ५ मिनिटे दर्शन झाले होते त्यांचे. राजहंसाचे चालणे बघणे हा एक सुखद अनुभव देऊन जातो. त्यांचे ते गुलाबी पंख, लांब पाय आणि मान डोलवत चालणे हे खरेच विलक्षणीय आहे. ह्या वेळी राजहंसांचे चालताना "Video Recording" केले. घरी आल्यावर भाऊ आणि आईला दाखवताना जी मज्जा आली ती वेगळीच!
जसे राजहंसांचे चालणे विलक्षणीय आहे तसेच ते जेव्हा उडतात , तेव्हा त्यांच्या पंखांचा दिसणारा तो गडद गुलाबी रंग लक्ष वेधून घेतो!
भिगवणच्या ह्या वेळीच्या दौऱ्यावर बऱ्याच पक्ष्यांचे दर्शन झाले. शेकट्या (stilt) हा असाच एक सुंदर लहानसा आणि माझ्या आवडीचा एक पक्षी. गावातले लोकं त्याला "बच्चन" म्हणतात असं आम्हास त्या बोट वाल्याने सांगितलं. त्याचे उंच पाय, लांब चोच, पांढरे पंख आकर्षित करतात.
"बच्चन" झाल्यावर अजून एका पक्ष्याला "शाहरुख" ची उपमा दिलिए गावातील लोकांनी! तो पक्षी म्हणजे "Little Cormorant".
रंगीबीरंगे आणि चमकणारे पंख ज्याचे आहेत तो म्हणजे "Glossy Ibis".
नीळसर आणि हिरव्या रंगांची छटा पंखांवर व पांढऱ्या रंगाचे शरीर, डोक्यावर कोंब असा हा "Comb Duck" :).
Blacktailed Godwit (मळगुजा) हा मोठ्या चोचीचा व पायाचा पक्षी. त्यांच्या मोठ्या चोची मुळे ते जमिनी खालील किडे सहज खाऊ शकत. मळगुजाचा एका पायावर उभा असलेला भारी "shot " मला मिळाला, जणू काही मळगुजा राज्यांनी नेम लावलाय आणि आता बाण सोडणारेत.
Rudy Shelduck (चक्रवाक) हे खूप गोंडस आहेत. ते न्हेमी एकत्र फिरतात. ते उडतात तेव्हा त्यांच्या पंखान मधला तो हिरवा रंग आकर्षित करतो.
ऊन थोडे वाढू लागले होते. तेवढ्यात आम्हाला Painted Storks चा घोळका दिसतो. त्यांच्या पिवळ्या चोचीवर पडलेलं ते उन, पांढऱ्या पंखांवर काळ्या रंगाची ती नक्षी आणि त्यातच मधेच कुठे तरी तो गुलाबी रंग. वाह! असे अनेक Painted Storks होते आणि त्यांचे पाण्यात पडलेल्या त्या प्रतिबिंबांनी एक वेगळंच वातावरण तयार केले होते.
तलावाच्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब पण आता स्पष्ट दिसत होते. पाणी एकदम शांत झाले होते. अश्या ह्या शांत पाण्यात फक्त आमची नाव सोबतीला राजहंस, Painted Storks, Stilts असे अनेक पक्षी! निसर्गाचं वेग वेगळ्या रूपाने दर्शन घडत होतं.
जसे पुढे येतो, तितेच मस्त गुलाबी चोचीचा एक पक्षी दिसतो. त्याची गुलाबी चोच, डोळ्या भवती गुलाबी वर्तुळ, पांढऱ्या रंगाचं शरीर व चॉकलेटी रंगाचा चेहरा. हा म्हणजे "Brown Headed Gull "
अजून एखादा फेरफटका मारायची आमची तयारी होती पण ऊन खूपच वाढलं होतं आणि बोट चालवणाऱ्या आमचा मित्र पण थकला होता. तलावाच्या काठावर आलो. सावली चा अनुभव घेतल्यावर थोडे बरे वाटले! तितेच आम्हास "Yellow Wagtail" चे दर्शन होते!
गाडी जवळ पोचताच एक मावशी दिसतात. एवढ्या रणरणत्या उन्हात त्यांना गाडीची थोडीशी पडलेली सावली मिळाली होती डब्बा खायला :). "पोरांनो या जेवायला" असे प्रेमाने बोल्या त्या. इकडे शहरात जेवलात का विचारायला शेजारच्यांना पण वेळ नसतो आणि इकडे ओळखत नसलो तरी त्या मावशींनी जेवायला बोलावले! त्यांचे ते २ शब्दच एकूण पोट भरले होते. आमच्या पेक्षा जास्त तर त्याच थकल्या होत्या कामं करून. त्यांचं जेवण उरकताच गाडीत बसलो आणि पुण्या कडच्या वारीला निघालो.
कॅमेरा चे लेन्स काढून ठेवणे, सगळे आवरून ठेवणे चालूच होते. तेवढ्यात आनंदला फोन येतो . आनंद गाडीत असलेल्या "bluetooth " ने "call" घेतो. "हेलो" एवढेच समोरून एकू येते, ते पण मुलीचा आवाज! आता मुलीचा आवाज म्हंटल्यावर साहेब लगेच का एकू येत नाही म्हणून मोबईल उचलतात, "bluetooth" off करतात आणि इकडे गाडी बाजूला घेतात तोवरच मोठा आवाज येतो!
गाडीच्या खाली एक मोठा दगड अडकला होता. आम्ही खाली उतरून बागतोच तेवढ्यात जवळच्या घरातले गावातील लोकं येतात! त्यांच्या काढून कळले की आवाज खूपच मोठा होता. गाडी खाली जो दगड अडकला, तो गाडीच्या "Base" ला टेकला होता. हा दगड जर जमिनीत रोवलेला असला असता तर कदाचित गाडी त्याला धडकून एक मोठा अपघात झाला असता, कारण समोरच खूप मोठा खड्डा होता! "Jack " लावून गाडी आधी वर उचली आणि दगड बाजूला काढला. गाडी सुरू करणार तोवर गावातील एक माणूस बोला "गाडी चा रॉड बेंड झालाय गाडी नीट चालणार नाही! ". गाडी "reverse " घेतली , आम्हाला वाटलं झाली सुरू, पण गाडी पुढे काही जात नव्हती. पुढच्या दोन्ही चाकांची दिशा विरुद्ध बाजूला होती . नीट पाहिल्यावर लक्षात आले "Power Steering चा रॉड बेंड झाला होता.
गावातील लोकांनी जवळच दुरुस्त करून मिळेल असे सांगितले. पण गाडी नवीनच होती, त्यामुळे कंपनी च्या लोकांना बोलवावे लागेल असे आनंद चे मत पडले. वोल्क्सवागेन ची पोलो होती. कंपनी ला फोन लावला. जवळ पास कुठले सर्व्हिस स्टेशन नाही , पुण्यावरून गाडी पाठवावी लागेल असे सांगितले. वोल्क्सवागेन ची एक गोष्ट आवडली ती म्हणजे तुमची गाडी कुठे ही बंद पडो, जागीच त्यांची लोकं गाडी उचलायला मोठा क्रेन घेऊन येतात व सोबत बाकीच्या गाडीतील लोकांना घरी जाता यावा म्हणून "cab" पण पाठवतात :). शेवटी असे ठरले की पुण्याहून गाडी येई पर्यंत थांबायचे! आता निदान गाडी येईला २ तास होते. एवढ्या उन्हात रस्त्यावर थांबलो!. गप्पा टप्पा चालूच होत्या. आनंद भरपूर प्रयत्न करत होता दाखवायचं की त्याला काही टेंशन नाही आले, पण घरी जाऊन आईला काय सांगायचे ह्याचा विचार कदाचित तो करत असावा. थोड्याच वेळात तिथे एक गृहस्थ आपल्या पत्नी व नातवंडांना घेऊन आले. "एवढ्या उन्हात कशा पायी थांबलात? वेळ आहे ना गाडीस येयला? चला घरात येऊन बसा सावलीत. थोडं खाऊन घ्या. चल ग पोरी!" असे ते गृहस्थ बोले. आम्ही नको म्हणतच होतो की "चल ग तिला घेऊन" असे ते आपल्या बायकोस बोले. शेवटी तिघेही त्यांच्या घरी निघालो.
भल्या मोठे अंगण होते, आणि अंगणाच्या चारही बाजूने घरे. मी व माझे मुले सगळे इथेच राहतो. ६ मुले होती त्यांना! त्यातल्याच एकाच्या घरात नेऊन पाणी पाजले. मी न आनंद ने थंडगार माठातले पाणी लगेच पिले. अजय मात्र दारातच आमचे पाणी पेऊन होईपर्यंत थांबला. परिस्थितीचा अंदाज घेतला व सगळे व्यवस्तीत वाटल्यावरच पाणी पिले. आजकाल कुणावर विश्वास ठेवता नाही येत व सोबत एक मुलगी म्हणून तो जरा खात्री करत होता.
पाणी घेऊन एक ५ मिनिट गप्पा मारल्या व आजोबांना सांगितलं की आम्ही बाहेरचं बसतो. बाहेर अंगणात समोरच एक उंबराचं झाड दिसतं! दत्ताच्या कृपेने अपघात होता होता वाचलो असं समजून त्या झाडाखालीच निवांत बसलो. आजोबांनी गादी पण आणून दिली बसायला. कंसाचे दाणे उकडून आणले आजींनी! आम्ही सकाळी काढलेले फोटो बघत बसलोच होतो, की आजी विचारतात "तुम्ही काय पक्षी बघायला आला होता एवढ्या लांब? आणि एवढ्या फोटोंच काय करणार?". आम्ही काही बोलायच्या आतच आजोबा बोले " हौस असते ग. छंद आहे पोरांना! हौस तरी कधी पूर्ण करणार आयुष्यात!" आजोबांचे हे वाक्य एकूण नवल वाटले व कौतुक पण. अगदी मळलेला पांढरा सदरा व पायजमा घातला होता त्यांनी. छंद, हौस हे त्यांच्या कडून अपेक्षितच नव्हते. इकडे शहरात पण आमचे आई वडील सुद्धा आमच्या या छंदाला कधी समजून घेत नाहीत आणि आजोबांनी अगदी सरळ सौम्य पणाने उत्तर दिले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या सुरकुत्यांनी अंदाज आलाच होता की खूप कष्ट केलेत त्यांनी. आता त्यांच्या ह्या उत्तरामुळे त्यांच्या बद्दल आदर थोडा वाढलाच होता. ऊगाच नाही, आजही ६ मुले व त्यांच्या बायका व मुला-बाळांसोबत आजच्या पिढी मध्येही एकत्र राहत होते.
मी घरी फोन करून बाबांना सांगितले घडलेला प्रकार व त्यामुळे उशीर होईल! बाबांनी विचारपूस केली व लवकर या असे सांगितले! आम्हास भूक लागली असेल म्हणून आजोबांनी जेवण करायचे का विचारले. त्यांचा तो पाहुणचारच आमच्यासाठी पुरेसा होता. बसल्या बसल्या उद्योग नव्हता म्हणून मनात विचार आले कि खरच पूर्वीची ती माणुसकी किती नाहीशी झलिए शहरात! शेजारच्या घरात कोणी संकटात असले तरी कोणी डोकावत नाही हल्ली, जेवणाला बोलावणे तर दूरच. त्या आजोबांशी गप्पा मारत बसलो आणि गोष्टीं मध्ये ऐकलेले ते पूर्वीचे दिवस आठवले. घरा समोर मोठे अंगण, आजी आजोबा नातवंडांना गोष्टी सांगत बसत अंगणात!. निरागस नातवंडांच्या चेहऱ्यावरचे ते स्मित हास्य. खरंच असे द्रुष्य हल्ली कमी बघायला मिळते!
अशीच वेळ निघून चाली होती तोवरच आनंदचा फोन वाजतो - " आम्ही क्रेन घेऊन आलोत भिगवणच्या चौकात. आनंद रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वराला चौका पर्यंत सोडण्यास सांगतो आणि क्रेन वाल्यांना गाडी पाशी घेऊन येतो. सगळे कागद पत्र पडताळून होतात, घटनास्थळी काय झाले विचारपूस होते, गाडी तपासली जाते व ते गाडीला क्रेन ला अडकवून निघतात. आमची "कॅब' अजून नाही आली म्हणून चौका पर्यंत सोडू का विचारतात. पण , अश्या क्रेन ला अडकवलेल्या गाडीत कसे बसायचे आणि त्यांना पण त्रास म्हणून आम्ही त्यांना पुढे जाण्यास सांगीतले. १५ - २० मिनिटे "कॅब" ची वाट बघितली व आजोबांना सांगितले चला आम्ही निघतो! निघता निघता त्यांची विचारपूस केली व "धुमाळ " आजोबांचा व आजींचा निरोप घेतला.
आम्ही रस्त्याने चालू लागलो ह्या आशेवर की लवकरच आमची "कॅब" येईल. पण २० - २५मिनिटे झाली तरी "कॅब" चा पत्ता नव्हता. अजून १० मिनिटे चलो असतो तर हायवे लाच लागलो असतो. तेवढ्यात समोरून एक पांढऱ्या रंगाची चार चाकी येताना दिसत होती. रस्ता रिकामाच असल्या मुळे व रहदारी ही जास्तं नव्हती, त्यामुळे वाटले की आपलीच "कॅब" असणार. नशीबाने ती आमचीच "कॅब" निघाली. ड्रायवर कढून कळाले शिरवळ जवळ मोठा अपघात झालाय म्हणून त्यास उशीर झाला. आम्ही गृहीतच धरले कि जाताना आणखी उशीर होणार.
अश्या रीतीने पुण्याचा परतीचा प्रवास चालू झाला. दुपारी १ वाजता पोचणारे आम्ही संध्याकाळी ७.३० ला घरी पोचलो. घरी आई ओरडणार हे मला अपेक्षितच होते. पण कुठल्या एका मुलाचे स्थळ आल्या मुळे ती त्याच गडबडीत होती. त्या मुलाबरोबर लग्न ठरू अथवा नको निदान आज त्याने वाचवले म्हणून त्याचे आभार मानले व पेट पूजा करून झोपून गेले.
दिवसभर थकलेल्या त्या शरीराला जेव्हा गादीची ती ऊब मळाली तेव्हा बरे वाटले. झोपता झोपता मात्र पाहटे पाहटे दिसलेले ते सोनेरी द्रुश्य आठवले, नाचणारे ते राजहंस, तलावातले ते पाणी आणि त्याच बरोबर गाडी बरोबर घडलेला तो प्रकार, उकडलेले कणीस , उंबराच्या झाडाखालची ती सावली व "धुमाळ" आजी - आजोबा आणि त्यांचे ते निरागस नातवंडे! पूर्ण दिवसाचा तो "falshback" आठवून डोळे मिटताच झोप लागली!
एरवी घरात आळशीपणाने लोळत घालवलेला शनिवार आज एक नवीन अनुभव देऊन गेला !
आमच्या त्या बोट वाल्या मित्राचे आम्ही आभारी आहोत. प्रत्यके पक्ष्या बद्दल त्याला अचूक माहिती होती. Sandeep Nagare (9960610615) व त्यांचे भाऊ लवकरच तिथल्या पक्ष्यांवर पुस्तक प्रकाशित करत आहेत! भिगवण ला जात असलात तर केव्हाही संदीप ला फोन करा, तो आपली बोट तयारच ठेऊन असतो :)...














